दुबई : आशिया चषक २०२२ चा उद्या रविवारचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईतील स्टेडियमवर होणाऱ्या या हाय होल्टेज सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या महामुकाबल्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ या सामन्यासाठी नव्या जर्सीत खेळणार आहे.

गत वर्षी वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा बदला घेण्यास रोहित शर्मा आणि पलटण उत्सुक असतील. पाकिस्तान देखील भारताविरुद्ध कडवी झुंज देण्याचा प्रयत्नांत आहे, पण पाकिस्तान संघासमोर अडचणी उभ्या राहत आहेत. दुबईतील याच स्टेडियमवर गतवर्षी झालेल्या टी-२०विश्वचषकात दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ आशिया चषकामध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. त्यामुळे सर्वत्र ‘मौका… मौका’, असे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याचा सामना जिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या दोन्ही संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले असून, बीसीसीआय आणि पीसीबीने आपआपल्या अधिकृत ट्वीटरवर खेळाडूंचे नव्या जर्सीतील व्हिडीओ पोस्ट केले आहेत. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया नव्या जर्सीत फोटोशूट सेशन करताना दिसत आहेत. या फोटो सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रवी अश्विन, दिनेश कार्तिक यांसह इतर खेळाडू दिसत आहेत.

आशिया कपपूर्वी पाकिस्तान संघाने देखील आपल्या नवी-कोरी जर्सीचे अनावरण करत दुबईत फोटोशूट केले आहे. या सर्वाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्वीटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू देखील फोटोशूटमध्ये दिसत आहेत.