मुंबई  : शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ ऑगस्ट रोजी सही केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. त्यामुळे लवकरच हे रिसॉर्ट इतिहासजमा होईल, असे किरीट सोमय्या म्हणाले.

महाविकास आघाडीतील नेत्यांची एक एक प्रकरण बाहेर काढून त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पुढचे लक्ष्य अनिल परबांना ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे पुरावे याआधीच दिले होते.

रिसॉर्टच्या बांधणीसाठी काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट ३१ जानेवारी २०२२ रोजी पुढील ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते; मात्र हा रिसॉर्ट न पाडल्याने याविरोधात किरीट सोमय्या यांनी मार्च २०२२ मध्ये दापोली कोर्टात अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिका केली होती.

किरीट सोमय्या म्हणाले की, हे प्रकरण आता पर्यावरण मंत्रालयाकडे गेले आहे. हे प्रकरण रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार असून, ते त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शनिवारी मी दापोलीला जाणार असून, दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा रिसॉर्ट इतिहासजमा होणार आहे, असे ते म्हणाले. अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोलीनजीकच्या मुरूड समुद्र किनारी एक कोटी रुपयांमध्ये जागा विकत घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झाले. पण नंतर २६ जून २०१९ ला ग्रामपंचायतीला पत्राला लिहिलेल्या पत्रासोबत जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडण्यात आला, असा दावा सोमय्यांनी यापूर्वीच केला आहे.