Breaking News

 

 

भरारी पथकानेच लपवला जप्त केलेला गुटखा : पाचजणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा निवडणूक विभागामार्फत नियुक्त केलेल्या केलेल्या भरारी पथकाने हिटणी (ता. गडहिंग्लज) येथे एसटी बसमधून पकडलेल्या गुटख्याच्या तस्करीवर कारवाई न करता त्यांना सोडून देवून ताब्यात घेतलेला गुटखा लपवून ठेवल्याचे उघड झाल्याने भरारी पथकातील पाचजणांवर गुन्हे दाखल करुन कारवाई सुरु केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) दिली.

गडहिंग्लज तालुक्यातील राज्याच्या सीमाभागावर तपासणीसाठी भरारी पथक नेमले होते. यामध्ये विलास मारुती हरेर (कनिष्ठ सहाय्यक चंदगड पं.स.), पथकप्रमुख अरुण वसंत करंबळकर (कनिष्ठ सहाय्यक गडहिंग्लज पं.स.), मधुराज गिरीराज धम्मदिक्षित (पोलीस हवालदार गडहिंग्लज पोलीस ठाणे), कृष्णा पांडूरंग कांबळे (पोलीस कॉन्स्टेबल, गडहिंग्लज पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.

या पथकाने ४ एप्रिलला रात्री कर्नाटकातून धारवाड ते गडहिंग्लज आलेल्या एसटी क्रमांक (केए २५ एफ २९८४) यामधून प्लॅस्टिकच्या पोत्यात असलेला गुटखा पकडला. पण याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस निरिक्षक, गडहिंग्लज पोलीस ठाणे यांना कोणतीच माहिती दिली नाही. जप्त केलेला गुटखा लपवून ठेवला. याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने या भरारी पथकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash