राशिवडे (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांची अपूर्ण वा प्रलंबित कामे पूर्ण करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा लाल बावटा संघटनेने सहायक कामगार आयुक्तांना दिला आहे.

बांधकाम कामगारांचे ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण तसेच लाभाचे अर्ज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे किमान तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ते तत्काळ पूर्ण करावेत, या मागणीसाठी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आल्यापासून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसह नूतनीकरण व लाभ वाटपाचे अर्ज तपासणी मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामध्ये तत्काळ सुधारणा करावी व कामगारांचे ऑनलाईन केलेले नोंदणी/नोंदणीकरण व लाभाचे अर्ज तत्काळ तपासावे आणि या प्रस्तावावर आठ दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष संदीप सुतार, पंकज सुतार आदी उपस्थित होते.