कोल्हापूर (प्रतिनिधी) : हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल व्यवसायात काम करण्यासाठी पुरेसा अनुभव व सातत्यपूर्ण अभ्यास याची गरज असते. केवळ पैसा आहे आणि पदवी मिळवली म्हणून या व्यवसायात पडू नका. पुरेसा अनुभव घेऊनच कोणत्याही व्यवसाय सुरु करा मग यश निश्चितच मिळेल, असा कानमंत्र ख्यातनाम शेफ पराग कान्हेरे यांनी दिला.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या २०२२ मध्ये पास आऊट झालेल्या बॅचचा निरोप समारंभ आणि नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात पाककृतीचे १५०० हून अधिक एपिसोड करणारे, ३ वर्ल्ड रेकोर्ड नावावर असलेले व  ‘बिग बॉस’ फेम ख्यातनाम  शेफ  पराग कान्हेरे  बोलत होते. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सीएफओ श्रीधर नारायण स्वामी, सीएचाआरओ श्रीलेखा साटम, स्कूल हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर आदी उपस्थित होते.

शेफ हा केवळ कुक नाही, तर तो सायंटिस्ट आहे, तो क्रीएटर आणि आर्टिस्टही आहे  हॉस्पिटॅलिटी व्यवसायाची सुरुवात आपल्या घरातच होत असते आणि आपली आई हीच जगातील सर्वात मोठी शेफ असते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य, ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद व समाधान हीच या व्यवसायातील यशाची मोठी पावती आहे. भारतीय हॉस्पीटलिटी इंडस्ट्रीला जागतिक पातळीवर मोठ्या उंचीवर नेण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असा सल्ला कान्हेरे यांनी दिला.

प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी अभ्यासक्रम, उपलब्ध संधी व प्लेसमेंट या बाबत माहिती दिली. वित्तअधिकारी नारायण स्वामी, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी हॉटेल मनेजमेंट क्षेत्र ही कधीही अस्त न पावणारे क्षेत्र असल्याचे सांगितले.

विविध स्पर्धांमधील विजेते व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन राहुल दाते आणि पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्या सर्व कर्मचाऱ्यानी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव यांनी केले. सुप्रीता जोशी यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.