Breaking News

 

 

विजयसिंह मोहिते-पाटलांचा राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न..?

पुणे (प्रतिनिधी) : मुलगा भाजपवासी झाल्यावर माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांनी राष्ट्रवादीला धक्का द्यायचे ठरवले असावे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत असलेल्या  भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून विजयसिंह मोहिते- पाटील  त्यांनी  कॉंग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन यांची अजित पवार आणि राष्ट्रवादी यांच्यावरील नाराजी लपून राहिलेली नाही. या पार्श्वभूमी झालेल्या या भेटीमुळे बारामतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांची नाराजी लक्षात घेता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना भेटीसाठी बोलवलं होतं. पण आज झालेल्या हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील भेटीमुळे पुन्हा एकदा बारामती मतदारसंघात नव्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.

बारामती मतदारसंघात कुठलीही कसर राहू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू, असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी कोणतेच ठोस आश्वासन दिलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते – पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग