राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार ?

0 1

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. अहमदनगर इथे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेंचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं दिसून येत आहे. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यानंतर आता वडील राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखेंनी जर भाजपात प्रवेश केला तर काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की असणार आहे. कारण निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर असणाऱ्या व्यक्तीनेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More