Breaking News

 

 

भाजपच्या जाहीरनाम्यात ‘जय जवान, जय किसान’चा नारा : शेतकऱ्यांना पेन्शन अन् प्रतिवर्षी ६ हजार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असताना भाजपने ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत आज (सोमवार) आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला संकल्पपत्र संबोधून ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ या शीर्षकाखाली विविध योजना राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं. या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना वर्षाला सरसकट ६ हजार रुपये आणि पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच शेतकऱ्यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंतच्या सर्वांची काळजी घेतली आहे. सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करतानाच त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार कऱण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी बोलताना राममंदिराचा उल्लेख केला. याशिवाय कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल असंही त्यांनी सांगितलं. या वेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजदेखील उपस्थित होत्या.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे – :

दहशतवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करणार, सुरक्षा दलाला पूर्ण मोकळीक,  प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, लहान मुलं आणि गर्भवती महिलांचं २०२२ पर्यंत लसीकरण, राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना, ५० शहरांत मेट्रोचं जाळं निर्माण करणार, रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी भारतमाला २.० द्वारे राज्यांना मदत, कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक, देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी योजनेचा लाभ देणार, छोट्या आणि शेतमजुरांना साठीनंतर पेन्शन, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या १० टक्क्याने कमी करण्याचा प्रयत्न, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सर्वांची सहमती घेणार, ५ किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश