Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – पालकमंत्र्यांची गुपचिळी का ?

राजकारणात विरोधकांवर तुटून पडणे, यात नवीन काहीच नाही. भाषणात विरोधकांचे वाभाडे काढणे, त्यांच्या कमजोरीवर बोलणे,  टीका करणे हे नेहमीच होत असते. पण, जिल्ह्यातल्या राजकारणात सध्या काहीतरी वेगळे घडतंय, हे लोकांना आता उमजू लागलंय.   

लोकसभा निवडणूक प्रचारात पालकमंत्री स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरत आहेत. कोल्हापूर मतदारसंघात प्रा. मंडलिक विरुद्ध खा. धनंजय महाडिक अशी लढत होत आहे. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात झाला. त्या वेळी ते त्या सभेत बोलले. त्यानंतर ते कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री फारसे ‘अॅॅक्टिव्हेट’ झाल्याचे दिसत नाहीत. दुसरीकडे मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या विरोधात पालकमंत्री रान उठवत आहेत. सदाभाऊ खोत यांच्या बरोबरीने त्यांचाच ‘आसूड’ त्यांच्या पाठीवर ओढत आहेत.

खा. महाडिक यांच्याविरुद्ध त्यांच्याच आघाडीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवकांनी उठाव केला आहे. पण, पालकमंत्री या विरोधी पक्षाच्या उमेदवाराबद्दल ‘ब्र’ काढताना दिसत नाहीत. याचे नेमके कारण काय असावे, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय पालकमंत्र्यांच्या पक्षातीलच काही जण खा. महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. महाडिक कुटुंबातील सदस्यही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात स्वारस्य घेताना दिसत नाहीत. त्यांची कोंडी झाली आहे, हे खरे आहे. पण, पालकमंत्र्यांची कोंडी का व्हावी, खा. महाडिक यांच्या विरोधात फारसे न बोलता त्यांनी ‘गुपचिळी’ का धरली आहे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील राजकारणावर महाडिक कुटुंबाचा प्रभाव आहे, हे नाकारून चालणार नाही. महापालिका, गोकुळ, जिल्हा परिषद, अनेक ग्रामपंचायती, पंचायत  समित्या तसेच अन्य काही संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत महाडिक यांचाच आधार घेऊन एक तर सत्ता मिळवली किंवा वर्चस्व ठेवले आहे. जिल्ह्यात म्हणावा तसा भाजपाचा फारसा प्रभाव नाही. मात्र भविष्यकाळात जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व ठेवायचे असेल, तर त्यांना दुखावून चालणार नाही, अशी त्यांची भूमिका असावी. याशिवाय खा. महाडिकही पालकमंत्र्यांच्या विरोधात फारशी टीका न करता राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर बोलताना दिसत आहेत. हेही आश्चर्यच आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार असूनही खा. महाडिक यांच्यावर फारसा आसूड पालकमंत्री फोडत करताना दिसत नाहीत.

एकूणच पालकमंत्र्यांची ही गुपचिळी अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आणि विचार करायला लावणारी आहे, हे मात्र निश्चित.

-ठसकेबाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा