कोल्हापूर (प्रतिनिधी) : वयोवृद्ध अल्प निवृत्त वेतनधारकांचे अस्तित्वच मानायचंच नाही. त्यांना केवळ गृहीत धरण्याची भूमिका सर्व संबंधित घटकांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठीचा लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे, असे प्रतिपादन सर्व श्रमिक संघाचे अनंत कुलकर्णी यांनी आज केले. ते बजापराव माने तालमीच्या सभागृहात आज झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी अनंत कुलकर्णी म्हणाले की, वयोवृद्ध निवृत्तीधारकांनी लावलेल्या वृक्षाच्या फळांचा लाभ सरकार घेत आहे. शक्य असूनही वयोवृद्ध, असाह्य निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभच मिळू द्यायचा नाही, अशी नकारात्म भूमिका सरकार घेत आहे. सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी ही केवळ ताकतुंबा करत आहेत. त्यामुळे यापुढे निकराचा लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून २५ ऑगस्ट रोजी ताराबाई पार्क येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चात निवृत्ती वेतनधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हिवाळी अधिवेशन आणि बजेटच्या काळात दिल्ली येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची ही पूर्व तयारी असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विक्रम हायस्कूल मैदानावर एकत्र जमून तेथून मोर्चा भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर जाणार आहे.

यावेळी प्रकाश जाधव, एन. एस. मिरजकर, विश्वास चौगले, दीपक चव्हाण, के. डी. पाटील यांच्यासह निवृत्ती वेतनधारक उपस्थित होते.