मुंबई/पुणे : अफझल खानाचा वधाच्या सजीव देखाव्याचा वाद आता राजकीय पटलावर रंगणार असे दिसत आहे. पुण्यातील एका गणपती मंडळाने अफझल खानाचा वध हा देखावा साकारण्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असल्याने पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या नकाराचे पडसाद सर्व राज्यात उमटताना दिसत आहेत. 

शिंदे-फडणवीस सरकारकडून वारंवार हिंदुत्ववादी सरकार असल्याचे भाष्य केले जात होते. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल, तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुणे पोलिसांनी शिवरायांच्या जिवंत देखाव्यास परवानगी नाकारली. त्यानंतर पुण्यातील गणेश मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यभरातून यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे शिवाजी महाराजांच्या तत्वावर चालणारे सरकार आहे. त्यांचा विचार पुढे नेणार सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत नक्की चर्चा करुन मार्ग काढला जाईल; मात्र विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केले आहे.

देखावा हा समाजप्रबोधन करण्यासाठी असतो. आम्ही दरवर्षी अनेक वेगवेगळे देखावे साकारतो. यंदा ‘अफझल खान वध’ हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पोलिसांनी या देखाव्यासाठी लागणारी परवानगी नाकारली. आपला इतिहास अनेकांना कळायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जो काही इतिहास आहे, तो दाखवण्यास काय भीती आहे? भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल, तर पाकिस्तानात दाखवायचा का?, असा संतप्त प्रश्न संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी उपस्थित केला होता.

देखाव्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल, तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते; मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतो आहे.