मुंबई :  हाती सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील बाकीचे टोलही बंद केले जातील, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यांनी आज (मंगळवार) मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आसूड ओढले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन अर्धवट सोडते असा आरोप केला जातो, पण अर्धवट सोडलेले एकतरी आंदोलन दाखवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. टोलमुक्तीसाठी मनसेने आंदोलन केले. या आंदोलनामुळे ६५-६६ टोलनाके बंद झाले; पण हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारणार नाहीत; मात्र मनसेबाबत खोटा प्रचार करतील, असा आरोपही राज ठाकरेंनी यांनी केला.

शिवसेना-भाजपने जाहीरनाम्यात लिहिले होते की, टोलमुक्त महाराष्ट्र करणार; पण त्यांना कोणीही प्रश्न विचारणार नाही. इतर टोलनाके आम्ही बंद केले; पण तुम्ही काय केले. पुणे, मुंबई, ठाण्यातील टोल अजूनही चालू आहेत. सर्वठिकाणी टोल चालू आहेत. टोलवर पैसे गोळा करतात, रक्कम गोळा करतात. आपला पहिला प्रश्न असा होता की, टोल किती वर्ष राहणार? किती पैसे गोळा होतात ? हे पैसे जातात कुठे? कोणाकडे जातात? ही सर्व कॅश कॅश कोणाकडे जाते ? त्याचं पुढे काय होते ? याची उत्तरे कोणत्याही सरकारने दिली नाहीत. ज्या ठिकाणचे टोल नाके बंद झाले, त्यांच्याकडून आशीर्वादच मिळाले. त्यामुळे द्या सत्ता हातात, बाकीचे टोलही बंद करून देतो, असे ठाकरे यांनीसांगितले.

महाराष्ट्रात जे दोन अडीच वर्ष सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी चांगले नाही. असे आधी कधीच झाले नव्हते. २०१९ ला मतदान केले त्यांना कळलंही नसेल की त्यांनी कोणाला मतदान केले. कोण कोणाला मिळाले हे कोणालाच कळत नाही. हे राजकारण नाही. ही तात्पुरती सत्तेची तडजोड आहे. मी बंड केल्याचंही मला मुलाखतीत विचारले गेले; पण माझं बंड लावू नका, हे सगळेजण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटून, त्यांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो, असेही राज ठाकरे म्हणाले.

भाजप नेत्या नुपूर शर्माच्या बाबतीत काय घडले, नुपूर शर्मा जे बोलल्या ते योग्यच बोलल्या. मी शर्माची बाजू घेतली. आज असदुद्दीन ओवेसी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. त्यांना माफी मागायला का लावत नाही, झाकीर नाईकला वेगळा आणि नुपूर शर्माला वेगळा न्याय का असाही सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.