हैदराबाद : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. टी. राजा यांच्या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरून उतरून आंदोलन करत आहे. यानंतर मंगळवारी सकाळी टी. राजा यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौका पोलिस ठाण्यांबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी जमा झाले होते.  आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संतप्त लोकांनी सांगितले. पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली.

टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही भाष्य केले आहे. टी. राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. याप्रकरणी त्याला पोलिस कोठडीही घेण्यात आली होती.