Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – राजकारणाची मिसळ अन् कटवडा…

पूर्वी निवडणुका आल्या की भागाभागात रस्सा मंडळांची झुंबड उडायची. गावागावातील, भागाभागातील कार्यकर्त्यांना एकत्र करून रस्सा मंडळ केले जायचे. त्याचा खर्च अर्थातच संबंधित नेता करायचा. २० – २५ कार्यकर्ते एकत्र येऊन याचा आनंद घेत. एकदा रस्सा, मटणावर ताव मारून झाला की खळ लावून ठिकठिकाणी प्रचाराचे पोस्टर लावायला कार्यकर्ते एका पायावर तयार होत.

यापैकी अनेकांचे आयुष्य खळ, पोस्टर लावण्यातच गेले. हातात मात्र धत्तुरा मिळायचा. आपला नेता आपल्याला खंडेनवमीच्या पूजनातील शस्त्र समजतो हे त्यालाही ठाऊक असायचे, पण बोलायचे कोणाला ? आजचा दिवस पार पडला यातच धन्यता मानली जायची. घरावर तुळशीपत्र ठेवून निवडणुकीच्या निकालापर्यंत कार्यकर्ते कामाला लागायचे. मटणाच्या दोन-तीन फोडी, तांबडा-पांढरा रस्सा आणि एखादी क्वार्टर किंवा देशी इतकंच काय ते पदरात पडायचं. कुटुंबाची फिकीरही हे कार्यकर्ते करत नसत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या संसाराची धूळदाण झाल्याची उदाहरणे आहेत.

आता काळ बदललाय. खळ, पोस्टरचा जमाना संपलाय. मात्र कार्यकर्त्यांचे महत्त्व अजूनही कायम आहे. समर्थक कार्यकर्त्यांचे मोहोळ आजूबाजूला असल्याशिवाय अनेकांना आपण नेता आहोत असे वाटतच नाही. दिशाहीन असलेल्या कार्यकर्त्यांची वानवा नाही. यामुळे आजही त्यांचा वापर निवडणुकीत केला जातो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. काही बेरकी कार्यकर्ते मात्र नेत्याची पाठच सोडत नाहीत. रोजची सोय केल्याशिवाय ते हलत नाहीत.

राजकारण तेच, पण कार्यकर्त्यांना हाताळण्याची पद्धत सध्या थोडी बदलली आहे. आता चरचरीत मिसळ आणि कट वडा हा फंडाही अवलंबला आहे.   ‘मिसळ पे चर्चा, कटवड्या वेळी चर्चा’ अशा नावाखाली कार्यकर्त्यांना एकत्र करायचे अशी पद्धत सुरू झाली आहे. प्रचाराचा नवा फंडा काढण्यात राजकारण्यांचा नाद करायचा नाही. तुमची मिसळ तर आमचा कटवडा असे म्हणत राजकीय कुरघोड्या केल्या जात आहेत. राजकारण करताना कार्यकर्त्यांना जपणे आवश्यक असतं. वापर करून झाल्यावर त्याचं पुढं काय होतं याची फिकीर नेत्याला नसते. कारण दर वेळी नव्या उमेदीचे कार्यकर्ते बक्कळ मिळतात, हे त्यांना माहीत असते.

निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो, हे उघड गुपित आहे. प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांना जपण्यासाठी खर्च करावा लागणे अपरिहार्य आहेच. त्यातही आता रस्सा मंडळाऐवजी हॉटेल व धाब्यांना भलतेच महत्त्व आले आहे. एक कुपन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले की ‘काम’ साधते हे नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. कोल्हापुरी झणझणीत गरमगरम मिसळ, कट वडा खाताना घाम फुटत असला, तरीही कार्यकर्ते त्याचा आस्वाद घेतात. पण निकालानंतर नेमका घाम ‘कोणाला’ फुटणार, हे २३ मे रोजी समजणार आहे.

-ठसकेबाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash