मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. सेन्सेक आज शेअर बाजारात ८७२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही २६८ अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आले  आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४५.६ लाख कोटी रुपयांची भर पडली होती. आता ६.५ लाख कोटी रुपयांचे  नुकसान झाले आहे. आजच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील भांडवली मूल्य २८०.५२ लाख कोटींवरुन ते २७४.०२  लाख कोटी रुपयांवर पोहोचले  आहे.

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारामध्ये सातत्याने खरेदी केली जात असतानाही गेल्या दोन दिवसात सेन्सेक्समध्ये जवळपास १७०० अंकांची घसरण झाली आहे. त्याचा फटका गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात बसला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची २५ ते २७  ऑगस्ट या दरम्यान बैठक आहे. या बैठकीत पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. फेडकडून येत्या काळात व्याजदरात ७५ अंकांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील महागाई दर दोन टक्क्यांवर आणण्यासाठी फेडकडून प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या बातम्यांमुळे यूएस डॉलरच्या इंडेक्समध्ये वाढ झाली असून तो १०८.४ वर पोहोचला आहे.