कोल्हापूर : हिंदूंच्या विविध सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हिंदूंबाबत पक्षपात केला जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांनी केला आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदू राष्ट्र जागृती आंदोलना’त बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करा, देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे आदित्य शास्त्री यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, रामभाऊ मेथे, शरद माळी, सनातन संस्थेच्या प्रीती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, पेठवडगाव येथील भाजप युवामोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र बुरुड, भगवा रक्षक संघटनेचे कार्यकर्ते संतोष चौगुले (शिरोली), भुयेवाडी येथील पवन कवठे, महेश पाटील, रवींद्र खोचीकर, प्रकाश चौगुले, साधना गोडसे, शिवानंद स्वामी, संतोष सणगर, प्रीतम पवार, शशांक सोनवणे, मधुकर नाझरे आदी उपस्थित होते.