कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे नोकरीच्या नैराश्यातून युवकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. भिकाजी बाबूराव पाटील (वय ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पन्हाळा पोलीसात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिकाजी पाटील याचे  डीएड पर्यंत शिक्षण झाले असून तो नोकरीच्या शोधात होता. त्याच्या शिक्षणाच्या मानाने त्याला नोकरी मिळत नसल्याने तो सैरभर होता. त्यामुळे त्याने या नैराश्यातून राहत्या घरी माळ्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेहावर वाघवेत अंत्यसंस्कार करण्यात आले.