Breaking News

 

 

उद्या ‘या’ वेळेपर्यंत उभारावी गुढी…

मुंबई (प्रतिनिधी) : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. उद्यापासून (शुक्रवार) शालिवाहन शके १९४१ विकारी नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत गुढी उभारून नवीन वर्षाचा संकल्प करावा, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या  नूतन संवत्सरामध्ये एकूण चार ग्रहणे आहेत, असेही सोमण यांनी सांगितले.

महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये नववर्ष दिन म्हणून साजरा करतो. गुजरातमध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा दिवाळी पाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. दक्षिण हिंदुस्थान, बिहार, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणामध्ये सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तो नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. या वर्षी १४ एप्रिल २०१९ रोजी या दिवशी नववर्ष दिन साजरा केला जाणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

गुढीपाडव्याचे महत्त्व – :

ब्रह्मदेवाने  या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे. तर प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.  पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.

One thought on “उद्या ‘या’ वेळेपर्यंत उभारावी गुढी…”

  1. दिवसभरात कधीही गुढी उभारावी .काही बंधन नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग