पन्हाळा (प्रतिनिधी)  किल्ले पन्हाळगड येथे दर अर्ध्या तासाला बस सेवा सुळसुळीत सुरू होती; परंतु कोरोना काळ, रस्ता भूस्खलन, तसेच एसटी संपामुळे चार/पाच वर्षे एसटी बस नियमित पन्हाळगडावर आली नसल्यामुळे विद्यार्थी, कामगारवर्ग व ज्येष्ठ नागरिक, पर्यटक यांचे हाल होत आहे. पन्हाळयाला त्वरित बस सेवा वेळेवर सुरु करावी, अन्यथा राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

विविध प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावाच लागत आहे. याकरिताच राष्ट्रीय बहुजन महासंघ या संघटनेच्या वतीने एसटी कोल्हापूर विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, पन्हाळा बस सेवेसाठी उदासीन भूमिका घेऊन जनेतेचे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान केले जात आहे.

कोल्हापूर आगारातून पन्हाळयाला ये-जा करण्यासाठी बस सेवा वेळेवर सुरु नाही. आगार व्यवस्थापक मनमानी कारभाराने विद्यार्थी वर्गाचे मोठया प्रमाणावर शैक्षणिक नुकसान करत आहेत. इतर प्रवाशांना पन्हाळा कोल्हापूर ये-जा करण्यासाठी खासंगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या स्थितीला राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक कारणीभूत आहेत. खासंगी वाहनधारकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात असल्याने याची चौकशी करून संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन महासंघाने केली आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करावी, असे संघटनेचे अध्यक्ष राजू सोरटे यांनी कोल्हापूर विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावर अर्जुन कासे, वैभव कोळी, निसार नगारजी, संकेत नाकरे यांच्या सह्या आहेत.