लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – पाऊस आणि राजकारण दोन्ही लहरीच..!

0 1

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील गावातील वाड्या-वस्त्यांवरील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापू लागले आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नेहमीचे तापमान मर्यादा ओलांडून पुढे जात आहे. राजकारणामुळे वाढणारे तापमान हे तात्पुरते असते. त्याची झळ शरीराला नाही तर मनाला लागते. व्यक्तिगत पातळीवर होणारे आरोप-प्रत्यारोप हे पाहून नेमके कोण चूक, कोण बरोबर कोणावर हे सामान्यांना समजत नाही. इच्छा नसतानाही हा ताप सहन करावा लागतो.

पाऊस आणि राजकारण यात बऱ्याचदा साम्य आढळते. राजकारण कधी बदलेल, कोण कोणाचा केव्हा मित्र अथवा शत्रू होईल हे सांगता येत नाही. गळ्यात गळे घालणाऱ्यांच्या मनात कधी शत्रुत्व निर्माण होईल हेही समजत नाही. राजकारण्यांच्या नादात सर्वसामान्यांमध्ये मात्र तेढ निर्माण होऊन वातावरण गढूळ होते. समाजात तणाव निर्माण होतो. पावसाचा देखील भरवसा नसतो. कधी पडणार हे निश्चित सांगता येत नाही मोक्याच्या या वेळी एक तर तो दडी मारतो किंवा हजेरी लावतो. निश्चित असं कधीच नसतं. गावंढळ पद्धतीने बांधलेले आडाखे असोत वा शास्त्रोक्त पद्धतीने अनेक वर्षांचा अभ्यास करून मांडलेले आडाखे ; ते खरे ठरतील की नाही याची शंभर टक्के खात्री देता येत नाही.

राजकारणाप्रमाणे पाऊसही लहरी असतो. राजकारण नेमके कोणत्या दिशेने जाईल तंतोतंत कळत नाही पावसाचंही अगदी तसंच असतं. या वर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज एका खासगी संस्थेने नुकताच जाहीर केला आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल, असे म्हटले आहे. त्यामुळे बळीराजाच्या मनात चिंता निर्माण झाली आहे पण सांगायचे कुणाला ?

लोकसभेच्या निवडणुकीत गर्क असणाऱ्या राजकारण्यांपर्यंत पावसाच्या अंदाजाची पहिली निराशाजनक बातमी पोहोचली की नाही हे माहीत नाही. पोहोचली असेल, तर या बातमीचे गांभीर्य त्यांना वाटत नसावे. त्यांचे सारे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल, आपला उमेदवार निवडून कसा येईल आणि त्यासाठी सर्वसामान्य मतदार मतांचा पाऊस कसा पडेल यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.

अगोदरच दुष्काळजन्य परिस्थिती, धरणातील घटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कमी पावसाची बातमी यामुळे पुढे कसे होणार याची काळजी बळीराजाला वाटू लागली आहे. पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावणार आहे. राजकारण्यांना सर्वसामान्यांच्या स्थितीबद्दल चिंता नाही. केवळ आपले राजकारण कसं चालेल, माझं कसं भलं होईल याचीच त्याला काळजी आहे राजकारणी आणि पाऊस ; दोघांवरही विश्वास ठेवता येत नाही, पण आशा कोणालाच सुटलेली नाही. त्यामुळेच उद्याच्या आशेवर जगत राहणे एवढंंच सर्वसामान्यांच्या हातात उरते. त्यामुळेच राजकारण आणि पावसात अधिक साम्य असतं. राजकारण आणि पाऊस दोन्हीही लहरीच असं म्हणणं चुकीचं होणार नाही…

– ठसकेबाज

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More