कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळमधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात ६ रुपये व गाय दूध खरेदी दरात ४ रुपये विक्रमी अशी वाढ केली आहे. दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू आहे. आम्ही दबाव टाकणारे नाही, तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत’असा प्रतिटोला गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी शौमिका महाडिक यांना लगावला आहे.

रेडेकर म्हणाल्‍या, शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेच्या ठिकाणावरुन सत्ताधारी आघाडीवर केलेली टीका निरर्थक आहे. महासैनिक दरबार हॉल येथे पहिल्यांदा गोकुळची सर्वसाधारण सभा होत नाही. यापूर्वीही २६ सप्टेंबर २०१४ रोजी संघाची ५२ वी वार्षिक सभा महासैनिक दरबार हॉल येथे, २९ सप्टेंबर २०१३ रोजी ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व दि.४ मार्च २०१३ इ.रोजी विशेष सभा शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड या ठिकाणी घेण्यात आली होती.

महाडिक यांची टीका खोडून काढताना संचालिका रेडेकर म्हणतात, सध्या पावसाळ्याचे दिवस असून खुल्या जागेत सभा घेतली असता सभासदांची गैरसोय होऊ शकते. या कारणास्तव संघाच्या ताराबाई पार्क ऑफिसपासून जवळच असलेल्या बंदिस्त व पुरेशी बैठक व्यवस्था असलेला महासैनिक दरबार हॉल येथे सभेचे ठिकाण निवडण्यात आले आहे.

रेडेकर म्हणाल्‍या, शौमिका महाडिक यांनी टीका करण्यापेक्षा संघांनी घेतलेले सभासदाभिमुख निर्णय माहीत करुन घ्यावेत. सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी चेअरमन व संचालक सक्षम आहेत. राजकारण करत असताना संस्थेचे नाव खराब होणार नाही, सभासदांमध्ये गैरसमज होणार नाहीत इतकी तरी दक्षता महाडिक यांनी घ्यावी.