Breaking News

 

 

राजू शेट्टींकडून ब्राह्मण समाजाची बदनामी : निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले मतदारसंघात काल (बुधवार) प्रचारादरम्यान राजू शेट्टी यांनी ‘सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे, कुलकर्णी जात नाहीत’, असे जातीयवादी वक्तव्य करून समाजाची बदनामी केली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच शेट्टी यांचेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक, ब्राह्मण समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. सैन्यातही सामान्य पदापासून अनेक महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मण समाजातील देशभक्त आहेत. असे असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा जातीयवाद केला आहे. राजू शेट्टी हे लोकप्रतिनिधी असून त्यांना सैनिक हा जातीचा नसतो तर देशाचा असतो हे समजू नये हे दुर्दैवी आहे. राजू शेट्टी यांनी माहिती घ्यावी. शहिद जनरल अरूणकुमार वैद्य यांच्यापासून विंग कमांडर अभिनंदनपर्यंत समाजातील कित्येक जण सैन्यात आहेत. एअरमार्शल भूषण गोखले, कर्नल अरविंद जोगळेकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, जनरल डी.बी.शेकटकर यांच्यासारखी शेकडो नावं सांगता येतील. पण आम्ही त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून नाही तर देशाचे सुपुत्र म्हणून बघतो….

सैनिकांची जात काढून सैनिकांचा आणि ब्राह्मण समाजाचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे. अशा वक्तव्याबद्दल राजू शेट्टी यांचा जाहीर निषेध करीत आहोत. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची आणि सैनिकांची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष स्वानंद कुलकर्णी, शहराध्यक्ष अवधूत गोरम्बेकर, कोषाध्यक्ष अक्षय जेरे, कार्याध्यक्ष स्वप्नील मुळ्ये, शहर सरचिटणीस मयूर तांबे, लक्ष्मीदास जोशी, केदार वाघापूरकर, प्रणव निगुडकर यांच्या सह्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे