कागल (प्रतिनिधी) : आंदोलनाच्या कारणावरून निलंबित केलेल्या १२० एस. टी. कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी, या मागणीचे निवेदन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मागील आठवड्यात एस. टी. कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आपल्या मागणीसाठी शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरावा करून आम्हा एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या अपेक्षेने समरजितसिंह घाटगे यांना भेटले होते. या पार्श्वभूमीवर घाटगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निलंबित कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याबाबत विनंती केली. फडणवीस यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही घाटगेयांना दिली आहे.

एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा झाली होती; परंतु राज्य सरकारने त्याची पूर्तता केली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केल्याने माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान, यातील दोन कर्मचारी मयत झाले आहेत. कामावर नसलेल्या  कर्मचाऱ्यांची आर्थिक हेळसांड होत असून, कुटुंबांची वाताहात होत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने एस.टी.च्या प्रलंबित देण्यापैकी शंभर कोटी रक्कम तातडीने दिली आहे. उर्वरित रक्कमसुद्धा लवकरच देण्यात येणार असल्याने हे सरकार आपला प्रश्न मार्गी लावेल, अशी आशा या कर्मचाऱ्यांना आहे.

घाटगे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात संजय घाटगे, संजय काळेभोर, आप्पासो शेट्टी, पी. आर. पोलीस, श्रीमंत घोरपडे, कृष्णात कोरे, अनिल चव्हाण, संताजी देसाई, वकील  ए. डी. मदने, युवराज खांडणे, हेमंत कानकेकर व मासूमकर यांचा समावेश होता.