मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. घरात सनईचे सूर आळवले जात असून, मुलगी सारासह इतर महिला मेहंदी काढण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

सचिन तेंडुलकरला एकूण तीन भावंडे आहेत. सचिनचे वडील प्राध्यापक होते. नितीन तेंडुलकर हा या चार भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ. त्यानंतर अजित तेंडुलकर. सचिनला क्रिकेटच्या मैदानात आणण्याचे श्रेय सचिनने नेहमीच अजित तेंडुलकरला दिले आहे. या तीन भावंडांमध्ये एक बहीण आहे. सचिनच्या तिन्ही भावंडांचे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मोठे योगदान असल्याचे अनेकदा म्हटले आहे.

सचिन तेंडुलकर हा फक्त भारताचा नव्हे तर जगभरातील अनेक क्रिकेट प्रेमींचा लाडका खेळाडू आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता बरीच वर्ष झाली आहेत, तरीही सचिनची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. सचिनने एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन पारंपरिक वेशात असून, तो डोक्यावर ‘फेटा’ बांधताना दिसतो आहे.

सचिनच्या या व्हिडिओमध्ये त्यात बॅकग्राऊंडला ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे सुरू आहे. सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिष्मा ही लग्नासाठी पारंपरिक वेशात तयार झाली आहे. ‘माझा मोठा भाऊ नितीनच्या मुलीचे करिष्माचे लग्न आहे आणि म्हणून मी हा फेटा बांधत आहे,’ असे सचिन म्हटले आहे. त्याच्या या व्हिडिओला सर्वच चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

सचिनचा पारंपरिक मराठमोळा लूक सर्वांनाच आवडला आहे आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासह अनेकांनी कमेंटदेखील केल्या आहेत. सचिनसोबतच त्याची मुलगी सारा तेंडुलकरने देखील इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सारा देखील पारंपरिक वेशात असून, ती हातावर मेहंदी काढताना दिसत आहे. नितीन तेंडुलकर यांची मुलगी करिष्माच्या हातावरील मेहंदी देखील खुलून दिसत आहे. सचिन सहकुटुंब या लग्नसोहळ्यात होता, पण मुलगा अर्जुन कपूर त्या लग्नात दिसला नाही. अर्जुनच्या इन्स्टाग्रामवरुन तो स्टेडियमच्या इंडोरमध्ये सराव करताना दिसत आहे.