टोप (प्रतिनिधी) : शिये फाटा मार्गे बावडा-कोल्हापूरकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गुरुवारी सकाळी पाणी वाढल्याने शिरोली पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेडस् लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

बुधवारी आणि आज पावसाने विश्रांती दिली असली तरी गेले काही दिवस मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेने इशारा पातळी गाठली आहे. तसेच धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. त्यातच राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पंचगंगेच्या पाणि पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. बुधवार दुपारपासून राष्ट्रीय महामार्गवरुन शिये फाटा मार्गे बावडा-कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी येण्यास सुरु झाले होते, तर आज सकाळी दोन्ही मार्गावर पाणी आल्याने यातून धोकादायक वाहतूक सुरु होती; पण सकाळी ११ च्या सुमारास शिरोली पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला.

कोल्हापर परिसरातील गावांचा शिरोली एम.आय.डी.सी तसेच राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी बावडा मार्गे मोठ्या प्रमाणात वापर होतो; पण हा मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गाचा वापर वाहनधारकांनी करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.