कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘भारतमातेच्या रक्षणासाठी कारगिल युद्धात लढताना कोल्हापूरहून आलेल्या राख्यांनी लाख मोलाचे आत्मिक बाळ वाढवले’, असे  प्रतिपादन सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिवाजीराव पोवार यांनी व्यक्त केले. 

‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ या देश रक्षाबंधन उपक्रमांतर्गत श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जमा झालेल्या ७० हजार राख्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आज (मंगळवार) कसबा बावडा परिसरातील  महासैनिक दरबार हॉल येथे झाला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर एन. एन. पाटील (सांगवडेकर) सहायक जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन अशोक पोवार, कॅ. शिवाजीराव पोवार, टिटवे येथील शहीद शिक्षण समूहाच्या वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, माजी नगरसेविका माधुरी नकाते, माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, कल्पिता कुंभार, आदर्श करिअर ॲकॅडमीचे अंकुश टिकले, रोटरी क्लब कोल्हापूर रॉयलच्या सविता पाटील, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले जवान जोतिबा गावडे, सुनील चौगुले, उमेश पाटील आदी मान्यवरांचे स्वागत दीपक घाटगे, कमलाकर किलकिले, उमेश निरंकारी, युवराज जाधव, डॉ. सायली कचरे, सीमा मकोटे, महेश कामत आदींनी पुष्पगुच्छ व स्मृतचिन्ह देऊन  केले.

यावेळी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव राजेंद्र मकोटे, जयभारत हायस्कूलच्या अश्विनी पाटील, रोटरी क्लबच्या वारणा वडगावकर, एनसीसी मेजर सरोज यादव आदींनी आपली मनोगत व्यक्त केले. निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील यांनी, देश रक्षाबंधन हा सलग २३ वर्षे सुरु असलेला उपक्रम सैनिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या कलाशिक्षक सुनीता मेंगाणे, मालोजी  केरकर, देश भक्तिपर गीते सादर करणाऱ्या जय भारत हायस्कूल रुईकर कॉलनी, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसमर्थ जॉईन ग्रुप, तनिष्का ग्रुप, बाळासाहेब पाटील हायस्कूल आळते, जायंट्स क्लबसह शाळा, महिला बचत गट सहभागी झाले होते.