लंडन (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत पहिले सुवर्णपदक जिंकले.

पी. व्ही. सिंधू हिने एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या मिशेल लीचा सलग दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरती असलेल्या पी.व्ही. सिंधूने पहिला गेम २१-१५ असा जिंकला, तर दुसरा गेम २१-१३ असा जिंकला आहे. पहिल्या गेममध्ये मिशेलने जबरदस्त खेळ दाखवला मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने तिला संधी दिली नाही. दुसरा गेम भारताच्या स्टार खेळाडूने २१-१३ असा जिंकला.

दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या पी. व्ही. सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१४ मध्ये कांस्य आणि २०१८ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. सिंधूने या मोसमात मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे, तर २०१८ राष्ट्रकुलमध्ये सिंधूने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

पी. व्ही. सिंधू आणि मिशेल ली या सामन्यापूर्वी १० वेळा आमनेसामने आल्या होत्या. यामध्ये पीव्ही सिंधूने ८ वेळा सामना जिंकला होता, तर मिशेलने दोन वेळा विजय मिळवला होता. आता सिंधूने ९ व्यांदा मिशेलचा पराभव केला आहे. भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधू यावेळीही चमकदार खेळ करत आहे. पी. व्ही. सिंधूने राष्ट्रकुल २०२२ च्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या वाई जिया मिनचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१९, २१-१७ असा जिंकला होता.

भारताने १० व्या दिवशी म्हणजे रविवारी एकूण १५ पदके जिंकली, तरीही भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात १९ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने ६६ सुवर्ण, ५५ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंड ५५ सुवर्ण पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा २२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर १९ सुवर्ण पदकांसह न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, भारतापेक्षा एक स्थान वर आहे.