इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाजगौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे उद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी काढले. ते इचलकरंजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या समाज गौरव पुरस्कारावेळी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलकर्णी होते.

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून दिनदलित, वंचित आणि अस्पृश्यांच्या व्यथा आणि वेदनांचे वर्णन केले. अवघे दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ यांच्या साहित्यावर हजारो लोक संशोधन करीत आहेत. दलित, पीडित वर्गाच्या मदतीला धावून जाऊन त्यांची सेवा करा. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा, हीच अण्णा भाऊ साठे यांना खरे अभिवादन ठरेल.

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफांनी समाजातील तळागाळातील जनतेला आपलंस केले आहे. त्यातूनच त्यांची गोरगरिबांचे कैवारी ही प्रतिमा तयार झालेली आहे. ज्याप्रमाणे महापुरुष कधी जातीच्या चौकटीत बसू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आ. मुश्रीफ यांनी आपल्या कामालाही कधी जातीची चौकट घातली नाही.

यावेळी वेटलिफ्टर निकिता कमलाकर, श्रद्धा अकॅडमीचे आप्पासाहेब तांबे यांच्यासह, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट पदाधिकारी, असंघटित बांधकाम कामगार व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे,नितीन जांभळे, कोजिमाशी पतसंस्थेचे अध्यक्ष घुगरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चुरमुंगे,  इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, राहुल खंजिरे, अमित गाताडे आदी प्रमुख उपस्थित होते.