कुंभोज (प्रतिनिधी) : डेंग्यूसदृश आजाराचे लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळल्याने सध्या कुंभोज परिसरात प्राथमिक आरोग्य पथक व ग्रा.पं.च्या वतीने डेंग्यूपासून संरक्षणासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. आरोग्य पथकाचे कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून डेंग्यू हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.

सध्या कुंभोज परिसरात सर्दी, ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी दवाखान्याबरोबरच खासगी दवाखान्यामध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. काही रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली असून, ते सध्या खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.  कुंभोजमध्ये आरोग्य पथकाच्या वतीने गावात डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे केला जात आहे. खासगी डॉक्टरांना डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य पथकास देण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी श्रेयश चौगुले यांनी केले आहे.

कुंभोजमध्ये सध्या घंटागाडी बंद असल्याने गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने सध्या गटारी तुंबल्याचे चित्र दिसत आहे. ग्रा.पं.ने गावातील केरकचरा तत्काळ गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.