काँग्रेसची जखम वेळेत भरणार का ? : महाडिक गोटात ‘चिंता’  

कोल्हापूर (सरदार करले) : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे २५ दिवस राहिले आहेत. प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहचायला हवी होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात चित्र उलटेच आहे. काँग्रेसचे नेते अजूनही प्रचारापासून चार हात लांब आहेत. आम्ही महादिकांचा प्रचार करणार आहोत, इतके सांगून वेळ मारुन नेली जात आहे. काहीजण आघाडीच्या उमेदवारांना स्पष्ट विरोध करताहेत. काहींंच्या मनात अजूनही नाराजी आहे. ही नाराजी म्हणजे मोठा रोग नाही, तो बरा होऊ शकतो. झालेली जखम मोठी आहे, पण ती वेळेपूर्वी निश्चित भरेल आणि सर्व काही अलबेल होईल, असेही काँग्रेसचे नेते सांगताहेत. पण वेळ निघून गेल्यावर हातात काहीच राहणार नाही, अशी चिंता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या गोटातून प्रमुख नेते व्यासपीठावर येत नाहीत. आम्ही आघाडी धर्म म्हणून त्यांचा प्रचार करणार, असे केवळ सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात एकही नेता प्रचाराच्या या रणधुमाळीत दिसत नाही.

दुसरीकडे खा. महाडिक यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच उघड विरोध करणारे आ. सतेज पाटील यांचा विरोध अजूनही मावळत नाही. त्यांची सांगली, सातारा येथे निरिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात प्रचारात येऊ शकणार नाहीत हे उघड आहे. त्यांनी ऐनकेन प्रकारे आपला विरोध पुढे सुरु ठेवला आहे. त्यांनी त्यांचा उद्देश पूर्ण कऱण्यासाठी ‘मौन’ दौरा सुरु केला आहे. दुसरीकडे त्यांचे समर्थक समाज माध्यमातून अत्यंत शेलक्या शब्दात खा. महाडिक यांना विरोध करीत आहेत. ‘प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते. फुकट मिळणारा प्राणवायू देखील आयसीयूत गेल्यावर किती महागात मिळतो’ अशा बोचऱ्या शब्दात त्यांना विरोध केला जात आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी मान्य केली. शिवाय हा रोग दुर्धऱ नाही, तो बरा होऊ शकतो. जखम खोलवर आहे, ती भरायला वेळ लागेल. पण योग्यवेळी ती भरेल, असा विश्वास व्यक्त करत खा. महाडिक यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. परंतु त्यांनीही नेमका प्रचार कधी सुरु करणार हे सांगितले नाही. माजी जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटीलही प्रचारापासून चार हात लांब आहेत. त्यांना अजून निरोपच मिळाला नाही, असे सांगितले जाते.

कोल्हापूरचा हा गुंता वेळेत सोडवायचा कसा, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी कृषीमंत्री शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागणार असे दिसतय त्यासाठी २ एप्रिलला ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. त्यांच्या मध्यस्थीनंतर तरी हा गुंता सुटणार का? हाच खरा प्रश्न आहे. नाहीतर समाज माध्यमांवर म्हटल्यांप्रमाणे ‘आता वेळ निघून गेली आहे. आपलं ठरलंय’, हे खरं ठरणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अद्याप प्रचारात उतरलेले नाहीत. त्यामुळे खा. महाडिक यांचा प्रचार केवळ युवाशक्ती आणि भागिरथी महिला मंडळाच्या जीवावर सुरु आहे. अधून मधून राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ हेच काय ते दिसत आहेत. पण ते तरी हा भार कितपत ओढणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram