आजरा (प्रतिनिधी) : आजी-माजी सैनिकांना मोफत रुग्णसेवा देण्याची घोषणा आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केली आहे. डॉ. देशपांडे यांनी स्वतःच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प जाहीर केला आहे.

डॉ. देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात आज (मंगळवार) अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक विजयकुमार पाटील यांनी केले. यावेळी डॉ. देशपांडे दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला.

भरमूअण्णा पाटील म्हणाले, डॉ. देशपांडे यांनी अण्णा-भाऊ विविध संस्थाच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्यासाठी मोलाचा वाटा आहे. भाऊंचा वारसा पुढे नेटाने चालविला आहे. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी म्हणाले, आम्हाला संस्था समूह चालवीत असताना अनेक वेळा डॉ. देशपांडेंची मोलाची मदत आहे. त्यांच्या विचार विनिमयाने आम्ही हा संस्थेचा डोलारा चालवत आहोत. आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयवंतराव शिंपी म्हणाले, रुग्णसेवेबरोबरच सामाजिक सेवा घडवून डॉ. देशपांडेंनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी आजरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप देशपांडे, जी. व्ही. बांदेकर, के. व्ही. येसणे, प्रकाश वाटवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सूतगिरणीच्या चेअरमन अन्नपूर्णा चराटी, विलास नाईक, दशरथ अमृते, रमेश रेडेकर, अभिषेक शिंपी, डॉ. दीपक सातोस्कर, सुरेश डांग, जी. एम. पाटील, मारुती घोरपडे, जितू टोपले, रमेश कुरूणकर, संजयभाऊ सावंत किरण कांबळे, देशपांडे कुटुंबातील डॉ. अंजनी देशपांडे, सौम्या तिरुडकर, मीलन होळनकर यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक बाचूळकर यांनी केले. भैया टोपले यांनी आभार मानले.