कळे (प्रतिनिधी) : तांदूळवाडी येथील बळवंत रामजी पाटील यांच्या गावडमळा नावाच्या शेतातील घराची राखण करणाऱ्या कुत्रा व मांजरास तरस सदृश प्राण्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटील यांच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. रात्री तरस सदृश प्राण्याने बांधलेला कुत्रा व बाजूच्या मांजर यांच्यावर हल्ला करुन शीर फस्त केले होते. याची माहिती वनविभागाला मिळताच घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला पाहिले असता तरस सदृश प्राण्याचे ठसे आढळून आले. वनरक्षक संगीता देसाई-सावंत यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी वनसेवक रघुनाथ पाटील, संभाजी पाटील, विश्वास शिंदे उपस्थित होते.