साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील राज्य विद्युत कंपनीच्या तिसंगी येथील उपकेंद्रामध्ये अनागोंदी कारभार सुरु असून, येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुक्कामी राहण्याची सूचना द्यावी, कार्यालयात स्वच्छता कायम राखावी, वीज ग्राहकांच्या कामांची तातडीने निर्गत करावी, अशी मागणी तिसंगीतील नागरिकांनी केली आहे.

तिसंगीच्या उपकेंद्रामध्ये निवासी अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता अथर्व कोळी काम करत असून, येथे मुक्कामी व्यवस्था असतानाही ते राहत नाहीत. तसेच वरिष्ठ अधीक्षक अभियंता अंकुर कावळे व जाधव हे अथर्व कोळी यांना नेहमी पाठीशी घालत आहेत. एखादा शेतकरी वीज उपकेंद्रामध्ये काम घेऊन आला. तर त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व ताटकळ थांबवले जाते.

सध्या या उपकेंद्रामधून वीस गावांना वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी एक लाईनमन, तीन वरिष्ठ तंत्रज्ञ व दोन टेक्निशियन, अकाऊंट विभागाला ५ कर्मचारी काम करत आहेत. गावे वीस व कर्मचारी अकरा कायमस्वरूपी काम करतात. असे असले तरी कार्यालयात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कार्यालयातील सर्व फायली व दप्तर विस्कटल्याचे चित्र पहावयास मिळते. वीज मंडळाचे इतर साहित्यही ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले असते. विजेच्या खांबावर झाडांचे वेल चढलेले आहेत.

या उपकेंद्रामध्ये कमालीचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालयातील स्वच्छता, देखभाल यासह संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मुक्कामी राहण्याची सूचना द्यावी, अशी मागणी दिलीप पाटील, जी. एस. कांबळे, शब्बीर नाचरे, कृष्णात चिले, दीपक पाटील, गिरीश प्रभुलकर, आनंदा पाटील, दीपक सोनार यांनी केली आहे.