कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुभाषनगर येथील घरफोडीचा राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावून सोलापूर येथील चोरट्यास अटक केली. अरबाज लतिफ शेख (वय २१, रा. विष्णू लक्ष्मी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, चांदीचे दागिने असा ६४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.

सुभाषनगर येथील बाळूमामा गल्लीतील फिर्यादी राणी ओमप्रकाश पाटील या कामास गेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली होती. त्यामुळे राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू करून संशयित अरबाज शेख याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भगवान शिंदे, कॉ. नितीन मेश्राम, विशाल शिरगावकर, प्रवीण पाटील यांच्यासह पथकाने केली.