नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ सुरूच आहे. आज सोमवारी सलग दोनवेळा लोकसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतील गोंधळ संपला असून, वाढत्या महागाईबाबत सभागृहात चर्चा सुरू होणार आहे.

गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीने केलेली अटक, केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारने केलेला गैरवापर आणि लोकसभा सदस्यांपैकी चार खासदारांना चालू अधिवेशनातून निलंबित केल्याने काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ईडीच्या गैरवापराबद्दल आम्हाला चिंता आहे. सरकारी संस्थांचे काम राजकीय फायद्यासाठी वापरता कामा नये,तर त्यांचे विशेष कार्य असते. आपण अशा देशात आहोत जिथे लोकशाहीचे स्वतःचे महत्त्व आहे ते जपले पाहिजे. विरोधी नेत्यांचा आवाज दाबला जाऊ नये.