मुंबई (प्रतिनिधी) : रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे नेमके काय बोलायचे, सांगायचे याचे भान उद्धव ठाकरेंना राहिलेले नाही, अशी टीका बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचे हे विधान आपल्याला काळजाला लागले असल्याचे शहाजीबापू पाटील म्हटले आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.

‘संजय राऊतांचे शरीर, मन आणि बुद्धी कुचके आहे. ते कधी जनतेसमोर गेलेच नाहीत. तेच आदित्य ठाकरेंना काय बोलायचे शिकवत असतात; पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनीही तशा पद्धतीने बोलणे हा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा अपमान आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांचे महाराष्ट्रात जन्माला का आलात? हे विधान माझ्या काळजाला लागले. महाराष्ट्राबद्दल मी काही बोललोच नव्हतो. आसाममधील निसर्ग सौदर्याचे कौतुक करणे काही चूक नाही. ही राष्ट्रीय एकात्मकता आहे. महाराष्ट्र आहे म्हणून राष्ट्र आहे, आणि राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीने कोणताही विचार न करता टीका केली. त्यांनी आज आसामवर टीका केली, उद्या काश्मीर, परवा राजस्थानवर करतील, असे शहाजीबापू म्हणाले.

‘तुम्ही मुख्यमंत्री झालात याचे दु:ख नाही, पण शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. तसे न केल्याने राष्ट्रवादी सतत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केल्याचे सांगत राहिले. सत्ता, विकास हा राष्ट्रवादीच्या मालकीचा झाला. आम्ही आमदार फक्त लेटरपॅड घेऊन फिरत होतो, अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.