गारगोटी (प्रतिनिधी) : यावर्षी गणेशोत्सवासाठी सर्व निर्बंध हटवल्याने सर्व कारागीर आनंदी झाले असून, तरूण मंडळे समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशमूर्ती रंगवण्यासाठी व्यावसायिकांनी रंगांच्या दरात कपात करून कुंभार कारागिरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेणगाव (ता. भुदरगड) येथील मूर्तिकार संदीप आनंदा कुंभार यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना केली.

लवकरच सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु होईल. हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेणगाव (ता भुदरगड) येथील कुंभार व्यावसायिकांमध्ये मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे.

मूर्तिकार संदीप कुंभार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध उठविल्याने अचानक मोठ्या मूर्ती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आहे त्या मूर्तीवर रंग काम करूनच यावर्षीचा हा गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. मोठ्या उंचीच्या मूर्ती आता झटपट तयार होणे कठीण आहे. मोठ्या मूर्ती पूर्णपणे सुकवून त्याचे रंगकाम हातावेगळे करण्यात पावसाचाही अडथळा येण्याची शक्यता आहे.