कागल (प्रतिनिधी)  : आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक संदीप सोनुले यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले. कागलमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ गटास दुसऱ्यांदा खिंडार पडले आहे.

घाटगे म्हणाले, ‘बेघर वसाहतीला पूर्वी शाहूनगर असे नाव होते. त्या शाहूनगरचा लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी या तरुणांनी केलेला प्रवेश आम्हाला हत्तीचे बळ देणार आहे. यावेळी उसना उमेदवार न आणता शाहूनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल.

समाजकार्य करत असताना तुम्हाला लागेल ते पाठबळ आमच्याकडून मिळेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना कोणताही भेदभाव न करता राजकारण विरहित सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. कागलची ‘राजकीय विद्यापीठ’ ही ओळख पुसून शाहूंचे कागल बनवण्यासाठी सर्वजण हातात हात घालून एकदिलाने काम करूया.

यावेळी स्वप्नील सणगर, रवींद्र गोंधळी, तुषार माने, वैभव सणगर, सुरेश शिंदे, प्रसाद सोनुले, विनायक म्हाळुंगकर, अजय गोंधळी, अमोल सोनुले, किरण भोई, विशाल पाटील, सुरेश मोहिते, नितिकेश वाडकर, मयूर पाटणकर, राहुल मंगनाळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी प्रवेश केला. यावेळी मागील आठवड्यात भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक आनंदा पसारे उपस्थित होते.

माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे म्हणाले, ‘आम्ही प्रवेश करतेवेळी मुश्रीफ गटास आणखीन खिंडार पाडण्याचे नियोजन केले होते. भविष्यातही मुश्रीफ गटास आणखीन खिंडार पडणार आहे.