कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ७६ गटांचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

आरक्षण सोडतीमुळे काही मतदारसंघातील इच्छुकांना अपेक्षेप्रमाणे मिळाले, तर काही जणांची निराशा झाली. आरक्षणावर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना करता येणार आहेत. हरकतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण पातळीवर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आरक्षण सोडतीवेळी इच्छुकांनी गर्दी केली होती.

ओबीसीसाठी २० प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दहा महिलांसाठी आरक्षण निश्चित केले आहे. अनुसूचित जातीसाठी दहा मतदारसंघ राखीव असून, त्यामध्ये पाच महिलांना संधी मिळणार आहे. ४५ मतदारसंघ सर्व साधारण आरक्षित झाले असून, त्यामध्ये २२ महिलांना संधी प्राप्त होणार आहे. पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघ अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे.