नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंद खोलीत मुलाखत काय देता, मोकळ्या मैदानात या, लोकांच्यासमोर भाषण करा, या फिक्स मॅचला लोक आता कंटाळले आहेत, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. मुलाखत घ्यायचीच असेल तर राऊतांनी एकनाथ शिंदे, फडणवीस, राज ठाकरे यांची देखील घ्यावी, असे आवाहन देखील दानवेंनी केले.

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी  ठाकरेंच्या मुलाखतीतील अनेक मुद्द्यांना हात घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पंतप्रधान पदावर देखील दावा सांगतील, असा टोला ठाकरे यांनी लगावला होता. यावर दानवे म्हणाले, काहीतरी बोलायचे म्हणून ठाकरे बोलत आहेत, शिंदे यांचा पंतप्रधान पदावर डोळा आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. उलट ठाकरेंचाच पंतप्रधान पदावर डोळा आहे. त्यांचे नेते नेहमी ठाकरेंना देशाचे नेतृत्व करायचे आहे, असे सांगत असतात.

भाजप-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, यावर `ये उपरवाले की मर्जी`, असा चिमटा ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून काढला होता. त्यालाही दानवेंनी प्रत्युत्तर दिले. दानवे म्हणाले, आमचा पक्ष कसा चालवायचा, कुणाला कोणते पद द्यायचे हे ठरवण्यासाठी आमचे नेते सक्षम आहेत, ठाकरेंनी त्याची चिंता करू नये.

बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संख्याबळ असताना देखील आम्ही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले होते, कारण आमचा पक्ष दिलेला शब्द पाळतो. तोच पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात राबवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर तुमचे पोट का दुखते? असा सवाल देखील दानवेनी केला. तुम्ही तर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो असे सांगता, पण एकनाथ शिंदे यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आणि एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, असेही दानवे म्हणाले.