नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. केंद्रीय एजन्सी ईडीने आज त्यांची सुमारे तीन तास चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीसाठी सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावण्यात आलेले नाही. गेल्या तीन दिवसांत सोनिया गांधी यांची तब्बल ११ तास चौकशी करण्यात आली आहे.

७५ वर्षीय सोनिया गांधी यांची ईडीने मंगळवारी सहा तास चौकशी केली होती. तसेच आजदेखील चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी २१ जुलै रोजी ईडीने त्यांची दोन तास चौकशी केली होती. ही चौकशी ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राच्या मालकीच्या ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत कथित आर्थिक अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची कोविड फ्रेंडली प्रोटोकॉलचे पालन करून चौकशी केली जात आहे. याचे ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून रेकॉर्ड केले जात आहेत. या सर्व चौकशीदरम्यान काँग्रसेकडून या कारवाईचा निषेध केला जात असून, याला ‘राजकीय सूड आणि छळ’ असे म्हटले आहे.

या प्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्यांची पाच दिवस ५० तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. ईडीने गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी तरतुदींखाली नवीन गुन्हा नोंदवला होता, त्यानंतर गांधी कुटुंबाची चौकशी करण्यात येत आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये दाखल केलेल्या वैयक्तिक गुन्हेगारी तक्रारीच्या आधारे येथील एका ट्रायल कोर्टाने यंग इंडियनविरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल घेतल्यानंतर ईडीने हा गुन्हा नोंदवला होता.