मुंबई (प्रतिनिधी) : अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांना शिवसेना, हिंदुत्व आणि मराठी माणूसही आठवला नाही. सत्ता गेल्यानंतर एक केविळवाणा प्रयत्न आणि व्यथा त्यांना महाराष्ट्रासमोर मांडली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना कोणतही दु:ख झाले नाही. उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दृष्टबुद्धी आहे, अशी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचे, ना शिवसैनिकांचे आणि ना हिंदुत्वाची कामे केली नाहीत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

राणे म्हणाले की, या मुलाखतीत मी आजारी होतो, माझे ऑपरेशन झाले. मी शुद्धीवर नव्हतो. त्याचवेळी गद्दारांनी सरकार पाडले, असे ठाकरे म्हणत आहेत. जेव्हा जे शिवसैनिक होते. तेव्हा त्यांनी सत्ता आणली. जेव्हा उद्धव ठाकरेंचे विचार जुळले नाहीत. तसेच ते पक्षपात करायला लागले. त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्या नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले.

संजय राऊतांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवायचे काम केले. आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. माझी माणसे विश्वासघातकी ठरली. तुम्ही कोणत्या शिवसैनिकांना विश्वास दिला. तुम्ही कोणत्या आमदार, खासदारांना आणि शिवसैनिकांना अडचणीत असताना मदत केली. तुम्ही त्यांना कधी भेट दिली आहे का, विश्वास दिला आहे का, तसेच त्यांना प्रेम दिले आहे का?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

मी वाचले की एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली होती नक्षलवाद्यांना. हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठे केलेली कर्तबगार माणसे शिवसेनेत उपजायला लागली. त्यावेळेला एकेकाला कमी करण्याचे काम यांनी केले. रमेश मोरेची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधवची हत्या कुणी केली? ठाण्याचा एक नगरसेवक, त्याची हत्या कुणी केली? नारायण राणेने शिवसेना सोडली, देशाबाहेरच्या गँगस्टरला सुपारी दिली. मी वाचलो तो माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे. तोंड उघडू नये, ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोलले की, आम्हाला असे काम मिळाले आहे. तुम्ही सावध राहा, नाहीतर दुसरे कुणी हे काम करेल, असा आरोप राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

राणे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंना प्रचंड छळले गेले. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खाते होते; मात्र या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे पाहत होते. त्यांनी कामांसाठी खोके जमा करण्याचे काम केले. ते खोके झेलायचे काम एकनाथ शिंदेंकडे सोपवले होते. एकनाथ शिंदेंनी हे सर्व सहन केले. मी सहन केले नसते.

नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवरही बोचरी टीका केली. राणे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दौऱ्यात आदित्य बंडखोर आणि भाजपवर टीका करत आहे; मात्र आदित्य यांना महाराष्ट्र तरी कळतो का? जवळपास साडेपाच लाख कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महाराष्ट्र राज्याचा मंत्री होण्याची तरी आदित्य यांची ऐपत आहे का? त्यामुळे त्यांनी आदित्य यांनी जास्त बोलू नये. आपले तोंड बंद ठेवावे, असा सल्लाही राणे यांनी दिला.