मुंबई (प्रतिनिधी) : ‘तुमच्यामध्ये कर्तृत्व नाही, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मते मागा’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच विषयांवर चर्चा केली.

ठाकरे म्हणाले, मी कायदा वाचला नाही, लिहिला नाही पण माझ्या माहितीनुसार आणि घटनातज्ज्ञांनी सांगितल्यानुसार शिंदेसमोर पर्याय हाच की, त्यांना पक्षात विलीन व्हावे लागेल. ते पक्षात गेले तर भाजपला त्यांच्याकडून जे ईप्तित साध्य करायचे आहे ते करता येणार नाही. आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही जनताच यांना निवडणूक, राजकारणात पुरुन टाकेल.

ठाकरे म्हणाले, चूक माझी आहे. गुन्हा माझा आहे की, मी शिंदे यांना परिवारातील समजलो. त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला. समजा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले असते, तर त्यांनी वेगळे काय केले असते. त्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. त्यांना अजून काय हवे आहे. ते स्वतःला बाळासाहेब मानत आहेत. माझे ते माझे असे होते पण आता याचे आणि त्याचेही माझेच अशी त्यांची वृत्ती झाली.

शिवेसनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. पक्षावर दावा केला त्यानंतर तुम्ही एवढे शांत कसे काय? असा प्रश्न विचारला उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत कसा? खरं सांगायचे तर मला चिंता नाही. चिंता माझी नाही, शिवसेनेची तर बिलकूल नाही; मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचे कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय, याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटले की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पाने गळणे गरजेची होती ती पाने उडून जात आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४ साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडले होते ? काहीच सोडले नव्हते. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिले हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोकं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया.