कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खासदार माने यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खा. निवेदिता माने यांनी त्यांचे स्वागत केले.

शिंदे गटात दाखल झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसेनेने आज माने यांच्या निवास स्थानावर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज सकाळी खासदार माने यांनी नवी दिल्ली येथे माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी पंचगंगा प्रदूषण, शेतकरी कर्जमाफी या संदर्भात माझ्याशी चर्चा केली. दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावले जातील अशी ग्वाही त्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न  माझ्यासमोर मांडले आहेत. यासाठी एक निश्चित कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अडीच वर्षात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

यावेळी खासदार संजय मंडलीक, माजी आमदार अमल महाडिक, डॉ.सुजीत मिणचेकर, सांगली जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, रवींद्र माने, विजयसिंह माने, समीर कदम आदी उपस्थित होते.