मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे पराभूत व्हावे लागलेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे  हे पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने हंडोरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वकीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले होते, त्यांची तक्रार हंडोरे पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली होती. काँग्रेस पक्षाने समिती पाठवून अहवालही मागविला आहे; पण त्यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने हंडोरे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द हंडोरे यांनी विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगबाबत नाराजी व्यक्ती केली होती.

तसेच ते शिंदे गटात जाणार असल्याची वावडी उठली होती. त्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. नाराजी व्यक्त करताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने हंडोरे यांची भेट घेतली. त्यावेळी नानांनी हंडोरे यांची मनधरणी केल्याचे सांगितले जात आहे. पटोले यांच्या भेटीनंतर चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, माझ्या पराभवामुळे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात नाराजीची भावना व्यक्त केली होती.