पुणे (प्रतिनिधी) : पुणे  जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे आज (सोमवार) शिकाऊ विमान कोसळले. या विमानाने बारामतीतून उड्डाण केले होते. या अपघातात पायलट युवती किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मान कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सुदैवाने हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले होते.

या अपघातात जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी पायलट युवतीचे नाव भावना राठोड असे आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले. बारामती येथील शिकाऊ विमान घेऊन पायलट युवती कसरत करत असताना हे विमान कोसळले आहे. हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. शिकाऊ विमानाच्या सहाय्याने कसरत करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले. ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले. त्यांनी पायलट तरुणीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या तरुणी पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून विमानाची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले आहे.

या पूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले होते. त्या अपघतात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला होता. या वेळी प्रशिक्षणार्थी युवती पायलट जखमी झाली आहे.