पनवेल : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे अचानक ठरले नाही, तो निर्णय आधीपासूनच झाला होता. कुठलेही सरकार पाडून सत्ता स्थापन करणारे आम्ही नाही. भाजप सत्तापिपासू नाही, हे आम्हाला दाखवायचे होते. सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी परिवर्तन झाले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेल येथे सुरु आहे. या बैठकीत फडणवीस हे बोलत होते.

राज्याची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटायचे. प्रकल्प-योजना बंद आणि भ्रष्टाचार सुरू होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असताना तोंड बांधून गप्प बसायचे. जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, तो हे सहन करू शकत नव्हता. शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली. आता जी शिंदे सोबत आहे ती खरी शिवसेना आहे, असेही फडणवीस म्हणाले.

गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीने सुडाचे राजकारण केले आहे. हे वर्षे खूप संघर्षाचे गेले आणि या अडीत वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला. प्रगतीची सर्व कामे थांबली गेली.केंद्राने कोट्यवधी रूपये देऊनसुद्धा नियोजित कामे मागच्या सरकारने बंद केली. त्यामुळे राज्यात हे सत्तांतर झाले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे,’ असा दावा फडणवीसांनी केला.

‘राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील ४० आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात येत आहेत. कारण त्यांना माहिती होते की, आपण येथे राहिलो तर संपणार आहोत. कारण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या अधिपत्याखाली काम करावे लागत होते हे त्यांना कळले होते आणि सरकारमधून मावळे बाहेर पडले. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना फोन करुनही त्यांनी घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कम राहिले की लढाई जिंकतोच, मात्र तिकडे सेनापती झाले आणि मागचे सरदार पळून गेले, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.