कोल्हापूर (प्रतिनिधी) : ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार राजकीय घमासान सुरु आहे. सध्या हा सर्व विषय न्यायालयीन कक्षेत आहे. या सर्व राजकीय साठमारीचे चित्र बुधवार, दि. २० रोजी स्पष्ट होईल, अशी आशा आहे. ठाकरे गटाला शह देण्याच्या इराद्याने आज (सोमवारी) शिंदे गटाने शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फक्त आठ खासदारच उपस्थित होते. या बैठकीला खा. संजय मंडलिक आणि खा. धैर्यशील माने हे अनुपस्थित राहिल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय भूकंपाचे केंद्र दिल्लीत असल्याने सध्या ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतील ४० खासदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना जोरदार राजकीय धक्का देत भाजपबरोबर नवी राजकीय मोट बांधली व विधानसभेत आपले बहुमत पारित करून घेतले. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेने या बंडाला शह देण्याच्या हेतूने न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सध्या नायालयात विधानसभा अध्यक्ष, शिवसेना कोणाची?  बहुमत चाचणी, उपाध्यश झिरवाळ यांच्यावरील अविश्वास अशा विषयांवर ती दाद मागितली आहे.

हे सर्व विषय दि. २० रोजी न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. ठाकरे गटाला शह देण्याच्या इराद्याने आज शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने ज्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, त्यांची वर्णी शिंदे गटाने आपल्या नव्या कार्यकारिणीत लावली आहे.

या घडामोडीनंतर आज संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राज्यसभेचे तीन आणि लोकसभेचे पाच असे आठच खासदार उपस्थित होते. राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्व खासदार दिल्लीमध्ये आहेत. अशा वेळी फक्त आठ जणच उपस्थित होते. खा. संजय मंडलिक आणि खा. धैर्यशील माने हे दिल्लीत असूनही या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीत असूनही सकाळपासून या दोघांचेही मोबाईल नॉट रिचेबल आहेत.

दरम्यान, विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या मंगळवारी १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून, शिवसेना एनडीएसोबत असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व गदारोळामुळे कार्यकर्ते चांगलेच संभ्रमावस्थेत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही खासदारांनी उघडणे कोणतीही टिप्पणी केली नसल्याने कार्यकर्ते विचारात आहेत, कोणता झेंडा घेऊ हाती ?