हमिदवाडा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खा. संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे. अशी आग्रही भूमिका हमिदवाडा कारखाना येथे झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मंडलिक युवा  प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.

विरेंद्र मंडलिक म्हणाले की, आजपर्यंत संपूर्ण राजकीय व सामाजिक वाटचाल ही कार्यकर्ते केंद्र बिंदू मानूनच आहे. स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या संस्कारवरच सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कार्यरत रहाताना कार्यकर्ते हेच आमचं कुटुंब आहे. कुटूंबातील प्रत्येक सदस्याला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय मंडलिक घेणार नाहीत. कार्यकर्त्यांना खा. संजय मंडलिक यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी आवाहन केले. आपण कोणासोबत जायचं असे विचारताच यावेळी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे हातवर उंचावून आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यासाठी आग्रही भूमिका असल्याचे सांगितले.

जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंडलिक गटाचा व्यापक मेळावा घेण्यात आला. त्यात उपस्थित सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी हात वर करून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी रहावे असा निर्णय घेतला. मात्र अंतिम निर्णय खा. संजय मंडलिक यांनीच घ्यावा, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तर दत्तात्रय कसलकर, महेश घाटगे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले पाहिजे असे मत व्यक्त केले. पण खा. मंडलिक जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असल्याचे सांगितले.

यावेळी जयवंत पाटील, भगवान पाटील, एन. एस. चौगुले, सत्यजीत पाटील सोनाळीकर, सुधीर पाटोळे, अनिल सिद्धेश्र्वर, आर. डी. पाटील, नामदेवराव मेंडके, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.