नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. पुढील आठवड्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती  वाढणार आहेत. अशा परिस्थितीत, घरगुती वस्तू, हॉटेल, बँक सेवा आणि बरेच काही यावर अधिक खर्च करावा लागणार आहे.

दि. १८ जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या दोन दिवसीय ४७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत केलेल्या शिफारशींनंतर अनेक वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी वाढवण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढणार आहे. छपाई/लेखन किंवा रेखांकन शाई, एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर, तसेच त्यांचे धातूचे मुद्रित सर्किट बोर्ड यांच्या किमतीत वाढ होईल. या वस्तूंवरील जीएसटी १२  टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.

चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअरच्या संदर्भात जॉब वर्कवरील जीएसटी दर ५  टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी या कामांच्या कंत्राटाचे दर १८ टक्के करण्यात येत आहेत. यापूर्वी त्यांना १२ टक्के जीएसटी लागायचा. टेट्रा पॅकवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील दर ०.२५ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता ५ टक्के जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. सरकारने ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर इत्यादींवर जीएसटी वाढवला आहे. आता त्यावर १८ टक्के दराने जीएसटी वसूल केला जाईल.

एक हजार रुपये भाड्याने घेतलेल्या हॉटेलच्या खोलीवर तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. आतापर्यंत एक हजार रुपयांपर्यंतच्या खोल्या जीएसटीच्या कक्षेबाहेर होत्या. यावर आता १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.